Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमफत्तेपूर खुनाचा गुन्हा उघडकीस, ८ तासांत आरोपी ताब्यात

फत्तेपूर खुनाचा गुन्हा उघडकीस, ८ तासांत आरोपी ताब्यात

पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई 

फत्तेपुर | जळगाव | पोलीस दक्षता लाईव्ह:- दि. २२ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कसबापिंप्री ते पिंपळगाव चौखांबे रोडवर एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याने फत्तेपुर पोलीस स्टेशनला खबर मिळाली. तपासात सदर मृतदेह शुभम धनराज सुरळकर (रा. कसबा पिंप्री) याचा असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब घातपाताची असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी तत्काळ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या पथकांनी तपास सुरू केला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मृतदेह त्या ठिकाणी न ठेवता दुसरीकडून आणल्याचे स्पष्ट झाले.

शुभमच्या घरातील पाहणी दरम्यान संशयास्पद चटई खाली रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे त्याचे वडील धनराज सुरळकर यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता आणि रागाच्या भरात डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. मृतदेह विल्हेवाटीसाठी त्याने दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हिरालाल यांची मदत घेतल्याचेही मान्य केले.

पोलिसांनी अवघ्या ८ तासांत आरोपी धनराज सुरळकर, गौरव सुरळकर आणि हिरालाल सुरळकर यांना अटक केली असून पुढील तपास फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या