जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात दहशत माजवण्यासाठी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला रामानंद नगर पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत गजाआड केले. आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
ही घटना गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री घडली. आरोपी रामेश्वर कॉलनीत घुसून गावठी कट्ट्यातून फायर केल्याने परिसरात खळबळ उडाली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार रामानंद नगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला.
घटनेनंतर आरोपी दीपक तरटे फरार झाला होता. मात्र, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला वेग दिला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रामेश्वर कॉलनी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईत दीपक तरटे अखेर जेरबंद झाला. चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
दीपक तरटे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे नोंद आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.