जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी गणेशोत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा यासाठी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. उत्सव काळात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, केमिकलयुक्त गुलाल टाळावा तसेच डीजे, लेझर लाईट याऐवजी पारंपरिक साधनांद्वारेच उत्सव साजरा करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करताना पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, उत्सवात कोणत्याही प्रकारचा गोंधळ, वाद निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक तसेच बाहेरील जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
डॉ. रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव आनंद, उत्साह व भक्तिभावाने साजरा करावा मात्र शासन व पोलिस प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शिस्तबद्धतेतूनच उत्सवाचे सौंदर्य खुलते, असेही ते म्हणाले.