रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर तालुक्यातील गाते गावाजवळील रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे गेट शनिवारी (दि. २८ मार्च २०२६) सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने गेटवर सूचना फलक लावून हा निर्णय जाहीर केला असून, अचानक झालेल्या बदलामुळे परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर ठिकाणी उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. संबंधित यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्णत्वास न गेल्याने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
हे रेल्वे गेट स्थानिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग होता. शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचा या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंब होता. गेट बंद झाल्यामुळे विशेषतः मालवाहू वाहनांना पर्यायी मार्गाचा अभाव जाणवत असून, वाहनचालकांना मोठा वळसा घालावा लागत आहे.त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्चात वाढ होत आहे.दरम्यान, वाढत्या वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उड्डाण पुलाचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा, अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

