जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील राजाराम नगर भागातील एका घरात घरफोडी झाली होती. या घरफोडीत तीन मोबाईल चोरून दिल्याची घटना घडली होती. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरटा राकेश कैलास जगताप (वय २०) रा. सम्राट कॉलनी याला स्थानिक गुन्हे शाखेने तो राहत असलेल्या परिसरातून अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात राजाराम नगर येथे चोरट्याने 59 हजार रुपयांचे तीन मोबाईल चोरून दिल्याची घटना घडली होती. या घटनेतील घरफोडीतील संशयित हा सम्राट कॉलनीत राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी संशयित राकेश यास तो राहत असलेल्या परिसरातून अटक केली. त्याच्याकडून गून्ह्यातील चोरलेले तीनही मोबाईल जप्त करण्यात आले, असून पुढील तपासासाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.