Saturday, March 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यागोजोरा येथे ८ मार्च रोजी श्री मरीमाता यात्रा ; बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा

गोजोरा येथे ८ मार्च रोजी श्री मरीमाता यात्रा ; बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा

सुनसगाव (ता.भुसावळ) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगावजवळ असलेल्या गोजोरा येथे सालाबादप्रमाणे यंदाही रविवार, ८ मार्च रोजी श्री मरीमाता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.या सोहळ्यात भगत आत्माराम बाबा दोडे हे शांताराम दोडे, जीवन जावळे व घनश्याम कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बारा गाड्या ओढणार आहेत. यावेळी भुरा सपकाळे व सोपान कोळी हे त्यांच्या बगले म्हणून सहभागी राहणार आहेत.

यात्रेनिमित्त श्री मरीमाता मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसरात विविध दुकानेही उभारली जाणार आहेत. यात्रेत खेळणी, पाळणे, मिठाई तसेच सौंदर्य प्रसाधनांची दुकाने नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय यात्रेच्या निमित्ताने क्रांती सोनवणे डोणगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेच्या आयोजनासाठी शिलीक दोडे, डिगंबर पाटील, तुषार सपकाळे, संतोष कोळी, संतोष पाटील, भुषण दोडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच गावातील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ सहकार्य करत आहेत.दरवर्षी एकदाच होणाऱ्या या यात्रेनिमित्त नोकरी व व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही मोठ्या संख्येने गावी परत येतात. त्यामुळे यात्रा शांततेत व सुव्यवस्थित पार पाडावी, असे आवाहन पोलीस पाटील विनोद सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी केले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औटपोस्ट येथील पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या