भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगावजवळील गोजोरा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मरी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित ‘बारा गाड्या’ कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात घडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १९ रोजी सायंकाळी चोरवड–गोजोरा रस्त्यावर श्री मरी माता यात्रेनिमित्त पारंपरिक ‘बारा गाड्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या गाड्या ज्ञानेश्वर सोनवणे हे ओढत होते. कार्यक्रम सुरू असताना चौथ्या व पाचव्या गाडीखाली एका हाताने अपंग असलेले अशोक बाबुराव कोळी (वय ५७) हे अचानक आल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या व ते गंभीर जखमी झाले.
जखमी अशोक कोळी यांना तात्काळ भुसावळ येथील डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृत अशोक कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुले व मुलगी असा परिवार असून ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली असून संबंधित प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आजतागायत ‘बारा गाड्या’ कार्यक्रम कोणतीही दुर्घटना न घडता पार पडत होता. मात्र यंदा प्रथमच अशी अपघाती घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

