जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आणि गोवंश चोरीत सहभागी असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी शनिवारी रात्री उशिरा मोठी कारवाई केली. इनोव्हा कारमधून पळ काढणाऱ्या आरोपींवर थरारक पाठलाग करीत एकाला अटक करण्यात आली असून पाच आरोपी फरार आहेत. या कारवाईत चोरीचा गोवंश व धारदार शस्त्रांसह दरोड्यात वापरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे त्यांच्या पथकासह दि. १५ जून रोजी रात्री जिल्हा गस्तीसाठी रवाना झाले होते. गस्तीदरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ चार संशयित व्यक्ती इनोव्हा (MH 31 CR 4728) कारमधून उतरून एका घराजवळ जाताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी कारने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी पोलिसांचे सरकारी वाहन धडकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.
सदर वाहनाच्या हालचालींची माहिती विविध जिल्ह्यांच्या पोलिसांना देण्यात आली. शेवटी अकोला जिल्ह्यातील रिधोरा परिसरात नागपूर-धुळे महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान इनोव्हा कार बंद पडली आणि आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. अकोला) यास घटनास्थळीच अटक करण्यात आली. कारमधून एक काळ्या रंगाचा बैल, तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉड, दोर, कपडे यासह दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
फरार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
सैय्यद फिरोज ऊर्फ अनडूल (रा. कसारखेडा, बाळापूर), अफजल सैय्यद (रा. काली घाणी पुरा, बाळापूर), इमरान (रा. बिकुंड नदी, कसारखेडा), तन्नु ऊर्फ तन्वीर (रा. काली घाणी, बाळापूर), अफरोज खान ऊर्फ अप्प्या (रा. अकोट फाईल, अकोला)
या कारवाईसाठी डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक), कृष्णांत पिंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पोउनि. अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, सफौ रवि नरवाडे, पोना/ श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भरत पाटील, आणि अकोला पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे उल्लेखनीय कामगिरी बजावली.