नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे मराठी नववर्ष गुढीपाडव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडी सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरातून करण्यात आली.नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला.विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात आणि ‘श्रीराम’ नामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला.दिंडीत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘राम आयेंगे’ या गाण्यावर तसेच गुढीपाडव्यावर आधारित नृत्य सादर करून नववर्षाचे स्वागत केले. तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू रामचंद्राची पालखी आणि विविध ऐतिहासिक व धार्मिक व्यक्तिरेखांची साकारलेली वेशभूषा होती. वनवासी श्रीरामच्या भूमिकेत रोहन चौधरी, लक्ष्मण – वेदांत माळी, सीता – संध्या जाधव, हनुमान – भूमेश पवार, तसेच राजाराम – प्रसन्न कुलकर्णी, लक्ष्मण – रुचित माळी, सीता – प्रियल महाजन आणि रावण – कृष्णा वाणी यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. शिवाजी महाराज, जिजामाता व राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषाही विद्यार्थ्यांनी सादर केल्या.माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हभप प्रभाकर महाराज, विलास महाराज व संजय महाराज यांच्या भजनांवर वारकरी वेशभूषेत टाळ नृत्य सादर करून दिंडीची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, उप कार्याध्यक्षा प्रमिला महाजन, ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, जितेंद्र महाजन, अॅड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दिंडी विठ्ठल मंदिरातून सुरू होऊन इंदिरा चौक, ग्रामपंचायत, शिवाजी चौक, रामपेठ, स्वातंत्र्य चौक मार्गे होळी मैदानाजवळ समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन स्वाती अत्तरदे, दिपाली माळी, सुनिता शिवरामे व वर्षा नारखेडे यांनी केले. त्यांना मुख्याध्यापक प्रविण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

