अमळनेर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– गुजरात राज्यातील गंभीर गुन्ह्यांत वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी पाठलाग करून पातोंडा गावातून अटक केली. पकडलेला आरोपी मनोज शिवाजी पाटील (वय ३४, रा. पातोंडा, ता. अमळनेर) याच्यावर गुजरात आणि बिल्लिमोरा येथे खून व खुनाचा प्रयत्न असे तब्बल १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुजरात पोलिसांना गेल्या अनेक महिन्यांपासून या गुन्हेगाराचा शोध होता. मात्र आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता. अखेर गुजरात पोलिसांनी अमळनेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल विजय भोई, राहुल पाटील व प्रशांत पाटील यांच्या पथकाने विशेष मोहिम राबवली.
संशयित आरोपीचा पत्ता मिळताच पोलिसांनी पातोंड्याकडे कूच केले. मात्र गावात आरोपीची दहशत इतकी होती की, त्याचे घर दाखवायला कोणीही तयार नव्हते. अखेरीस एका स्थानिकाने लांबून त्याचे घर दाखवले. पोलिस पथक घराजवळ पोहचले असता, आरोपीने मागच्या दाराने पळ काढला. मात्र पोलीस तत्परतेने त्याच्या मागे लागले आणि काही अंतराच्या पाठलागानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.
पोलिसांनी आरोपीला अमळनेर पोलीस ठाण्यात आणून आवश्यक कार्यवाही केली आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी गुजरात पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केले.या कारवाईमुळे अमळनेर पोलिसांचे कौतुक होत असून, त्यांच्या सतर्कतेमुळे एक धोकादायक गुन्हेगार अखेर गजाआड झाला आहे.