नाशिकरोड / प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- नासाका विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी होत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. असे गुणवंत विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती असतात, असे गौरवोदगार नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांनी काढले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवरील सीएमए इंटरमिजिएटच्या अंतिम परीक्षेत नासाका माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सोनाली पुंजाजी मुठाळ ही प्रथम आल्याबद्दल आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. मंचावर संतोष क्षीरसागर, रूपाली मुठाळ, सागर शिंदे, मुख्याध्यापक सुनील बर्वे, सर्व शिक्षक-कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सोनाली मुठाळ हिचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शालेय वयातच आपण आपले ध्येय ठरविण्याचा सल्ला देत विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करून उल्लेखनीय यश मिळवावे, अशी इच्छा सोनाली मुठाळ हिने व्यक्त केली. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले.