मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात गुटखाबंदी असतानाही शाळा व महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गुटखा उत्पादकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मकोका लावण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार असून, येत्या नववर्षापासून गुटखा उत्पादकांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
यापूर्वी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, विद्यमान कायद्यातील तरतुदीनुसार “हार्म” आणि “हर्ट” हे दोन्ही घटक सिद्ध न झाल्याने मकोका लागू करता येत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना, गुटखा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईसाठी कायदा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रस्तावित दुरुस्त्यांमुळे गुटखा उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात संघटित गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा व कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

