जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिकच्या बहुचर्चित “हनी ट्रॅप” प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, आता या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पॉक्सो कायद्यानुसार बलात्कार व हनी ट्रॅप प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रफुल्ल लोढा हे पूर्वी वंचित बहुजन आघाडीत होते, मात्र नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 5 जुलै रोजी मुंबईतील चकाला येथील ‘लोढा हाऊस’ येथून त्यांना अटक करण्यात आली. अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यांत त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
काय आहेत आरोप?
प्रफुल्ल लोढा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 16 वर्षीय मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर व तिच्या मैत्रीणीवर अत्याचार केला. त्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना धमकावल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. पीडित मुलींना जबरदस्तीने ‘लोढा हाऊस’ मध्ये डांबून ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे.
तपासाची व्याप्ती वाढली:
अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांवर झडती घेतली. झडतीदरम्यान लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
राजकीय संबंधांमुळे खळबळ:
प्रफुल्ल लोढा हे जळगावमधील एका मातब्बर नेत्याचे माजी सहकारी होते. भाजप प्रवेशानंतर त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थन मिळाले होते. मात्र आता त्यांच्या अटकेमुळे भाजपसह अनेक राजकीय नेत्यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाचा दुवा?
या घटनेचा संबंध थेट नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाशी जोडला जात असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत 72 वरिष्ठ अधिकारी आणि नेते या प्रकरणात अडकले असल्याचा आरोप केला होता.