मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्याला हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या आणि गंभीर घडामोडीची माहिती समोर आली आहे. राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, क्लास वन अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्र्यांसह जवळपास ७२ जण एका हनी ट्रॅप प्रकरणात अडकले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेकडे तीन स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारी कुणाकडून दाखल?
नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एका व्यावसायिक, ठाण्यातील एका प्रतिष्ठित व्यक्ती अशा या तक्रारी ठाणे गुन्हे शाखेकडे गोपनीय स्वरूपात दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय तपास सुरू आहे.
गुन्हा अद्याप नोंदवलेला नाही:-
तक्रारी गंभीर असल्या तरी अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. तपास यंत्रणांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, तपास पूर्ण होईपर्यंत माहिती गोपनीय ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणाचे स्वरूप काय?
प्राप्त माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना सामाजिक माध्यमांवरून, व्हॉट्सअॅप कॉलिंग आणि खाजगी भेटीच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून आर्थिक, राजकीय किंवा प्रशासकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता तपासात समोर येत आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणामुळे प्रशासन व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप कुणाचं नाव अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेलं नाही, पण प्रकरणाचं गांभीर्य पाहता येत्या काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

