मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेकडून शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या ११ जिल्ह्यांबरोबरच पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि नाशिक घाट परिसरात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन यंत्रणा सतर्क
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF आणि SDRF पथके हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधून तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुठे सर्वाधिक पावसाचा धोका?
कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे.
• नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
• नदी, नाले व धरण परिसरात जाणे टाळावे.
• अनावश्यक प्रवास टाळावा.
• घराबाहेरील झाडे, वीजतारा, फलक यांपासून दूर राहावे.
• प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
राज्यातील इतर जिल्ह्यांना ‘नो वॉर्निंग’ म्हणजेच कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, वातावरणातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.