यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुक्यातील हिंगोणा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने भीषण वळण घेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.मृत तरुणाचे नाव प्रथमेश मुकेश महाले (वय १९) असे असून, प्राथमिक माहितीनुसार किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या दरम्यान प्रथमेश याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.प्रकरणातील संशयित आरोपी गौरव जाधव (रा. खर्डी, सध्या मुक्काम हिंगोणा) हा घटनेनंतर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली असून त्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

