Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeजळगावजैन हिल्स येथे ‘कृषी महोत्सव २०२५-२६’चे उद्घाटन

जैन हिल्स येथे ‘कृषी महोत्सव २०२५-२६’चे उद्घाटन

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा : अशोक जैन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथे उपलब्ध असलेले आधुनिक कृषितंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहून त्याचा आपल्या शेतात उपयोग करावा. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर व शाश्वत होईल. या तंत्रज्ञानाचा लाभ स्वतः घ्यावा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंतही ही माहिती पोहोचवावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडतर्फे जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सव २०२५-२६’चे उद्घाटन अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शेतकरी शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अभंग जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. गौतम देसर्डा, बी. डी. जडे, अजय काळे, संजय सोनजे यांच्यासह जैन इरिगेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व अनुभव मिळावा, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून ‘कृषी महोत्सव’चे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात सूक्ष्म सिंचन (ठिबक) प्रणालीचे महत्त्व, पाण्याचे योग्य नियोजन तसेच त्यातून उत्पादन व उत्पन्नात होणारी वाढ यावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘अधिक उत्पादन, अधिक नफा’ हे या उपक्रमाचे सूत्र आहे.‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा देणारा महोत्सव’ म्हणून यंदा ‘सायन्स-टेक@वर्क’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. महिनाभर चालणाऱ्या या कृषी महोत्सवात हायटेक, प्रिसिजन व क्लायमेट स्मार्ट शेतीशी संबंधित जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. जैन हिल्स येथे विविध पिकांचे प्रत्यक्ष प्रयोग तसेच शास्त्रोक्त शेती पद्धतींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत. “बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही,” या तत्त्वावर आधारित हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना केवळ माहिती न देता तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा ठरणार आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीचे नवे साधन ठरणाऱ्या या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या