राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सन्मान सोहळा
नवी दिल्ली | वृत्तसेवा :- शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक क्रांती घडवणाऱ्या अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कंपनीला ५६व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्समध्ये इंडस्ट्रीयल मशिनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान भारत सरकारच्या इंजिनीअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (ईईपीसी इंडिया) द्वारे आयोजित केला गेला. पुरस्कार सोहळा विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल आणि ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा प्रमुख उपस्थित होते.
भारताच्या कृषी व औद्योगिक प्रगतीसाठी मोठे योगदान..
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात भारताच्या प्राचीन आध्यात्मिक व वाणिज्यिक नेतृत्वाची आठवण करून दिली. त्यांनी जागतिक नवोपक्रम अर्थव्यवस्थेत भारताच्या स्थानाला बळकट करण्यासाठी आणि “नेशन फर्स्ट” च्या भावनेने देशाला ज्ञान व वाणिज्याचे जागतिक केंद्र बनवण्याचे आवाहन केले. गेल्या दशकातही भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली असून, ७० अब्ज डॉलर्सवरून ती ११५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
पुरस्कार स्वीकारतांना…
जैन इरिगेशनचा राष्ट्रीय पुरस्कार कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन व जैन फार्मफ्रेश फुड लि. चे संचालक अथांग जैन यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी त्यांनी कंपनीच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाची, शाश्वत तंत्रज्ञानाच्या वापराची आणि नवोपक्रमांची विशेष नोंद घेतली.
अभियांत्रिकी निर्यातीसाठी अग्रगण्य योगदान
जैन इरिगेशन केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा, प्लास्टिक पाइप्स आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अग्रगण्य कंपनी आहे. ६० वर्षांहून अधिक काळात कंपनीने गुणवत्तापूर्ण संशोधन, शाश्वत विकास, आणि जागतिक ग्राहक विश्वासार्हता यांच्या माध्यमातून भारताच्या कृषी व अभियांत्रिकी निर्यातीला नवे आयाम दिले आहेत.
कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले,
“हा पुरस्कार केवळ आमच्या कंपनीचा सन्मान नाही, तर भारताच्या कृषी व औद्योगिक प्रगतीचा गौरव आहे. आम्ही हा सन्मान शेतकरी बांधवांना व सहकाऱ्यांना समर्पित करतो, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे ही उपलब्धी शक्य झाली आहे.”
ईईपीसी इंडियाचे महत्त्व..
ईईपीसी इंडियाची स्थापना १९५५ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत करण्यात आली. आजच्या दिवशी १२,००० हून अधिक सदस्य कंपन्यांच्या सहकार्याने ती भारतातील अभियांत्रिकी व तांत्रिक उत्पादन निर्यातीसाठी प्रमुख संस्था बनली आहे. विविध बाजारपेठ विकास, खरेदीदार-विक्रेता मेळावे व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या माध्यमातून निर्यातदारांना मार्गदर्शन व सहाय्य प्रदान करणारी संस्था आहे.