जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. कॅरम या लोकप्रिय घरगुती खेळाला जागतिक स्तरावर नेणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात जैन इरिगेशनच्या तब्बल तीन खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा येत्या २ ते ६ डिसेंबरदरम्यान मालदीवमध्ये रंगणार असून या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व जळगावच्या तीन कॅरमपटूंकडून होणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर आणि झैद फारुकी या तिघांचा समावेश आहे. या खेळाडूंनी यापूर्वी आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे पार पडलेल्या फेडरेशन कप स्पर्धेत आणि दिल्ली येथे जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. या स्पर्धांमध्ये जैन इरिगेशन कंपनीच्या महिला व पुरुष संघांनी अंतिम विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. त्याच कामगिरीच्या जोरावर या तिघांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
मालदीवमध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, युरोपियन संघ, अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड यांसारख्या जगातील प्रमुख देशांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर आव्हानात्मक स्पर्धा असली तरी जळगावच्या या तीन खेळाडूंकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन यांच्यासह सहकाऱ्यांनी तिघा खेळाडूंचा गौरव केला आहे.
जळगावकरांसाठी आणि जैन इरिगेशनसाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात असून, कॅरम या खेळाला नवे यशस्वी पर्व गाठून देण्याची संधी या तिघा कॅरमपटूंकडे आहे.