जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकास व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी भूषवले.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध उद्योग प्रतिनिधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अधिकारी तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उद्योगासाठी पूरक बाबींवर सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील उद्योगांसाठी पुरेशी जमीन उपलब्धता, मूलभूत सुविधा जसे की वीज, पाणी, रस्ते, कुशल मनुष्यबळ व वाहतूक सुलभता, जलसंपत्ती आणि प्रशासनाकडून उद्योगांना मिळणारे पाठबळ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, “जळगाव हे जिल्हा उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या संधी देऊ शकतो. गुंतवणूकदारांनी या संधींचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत योगदान द्यावे.”
या बैठकीत विविध उद्योगांसमोरील अडचणी, सुलभ परवाना प्रक्रिया आणि औद्योगिक धोरणांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. प्रशासनाकडून उद्योगांना ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’च्या अंतर्गत सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली.