जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग आणि माजी हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, येत्या १२ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून जोर पकडेल, तर १४ ते १६ जून दरम्यान खान्देश आणि जळगाव परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या मान्सून पुणे-मुंबई परिसरात अडकलेला असला तरी, १२ जून नंतर वातावरण बदलण्याची चिन्हं आहेत, आणि त्यामुळे मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. जळगाव, नाशिक, खान्देश आणि विदर्भाचा काही भाग अजून मान्सूनच्या मुख्य लाटेपासून वंचित आहे. मात्र हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३–४ दिवसांत या भागात मान्सून पोहोचण्याची शक्यता बळावली आहे. जळगावात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता असून, तो शेतीसाठी लाभदायक ठरणार आहे, असा विश्वास कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे देण्यात आलेल्या विशेष सूचना.
पेरणीपूर्व तयारी: १५ जून नंतर जमिनीत पुरेशी ओल येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला वाफसा होईपर्यंत प्रतीक्षा करून पेरणी करावी.
सिंचन असलेल्यांसाठी: सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना ११–१२ जून दरम्यानच पेरणीचा विचार करता येईल.
पूर्व-पेरणी करणाऱ्यांसाठी दिलासा: मे महिन्यात पूर्व-मॉन्सून पावसावर पेरणी केलेल्या पिकांना १२ जूननंतरचा मान्सून पाऊस बळकटी देणार आहे.
शेतकऱ्यांनी काय तयारी करावी कृषी तज्ज्ञांचा सल्ला.
शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड, शेतजमिनीची मशागत आणि पाणी साठवणुकीची सोय वेळेत करून घ्यावी.
हवामान खात्याचे अद्ययावत अपडेट्स आणि स्थानिक कृषी कार्यालयाचा सल्ला नियमित घ्यावा.
नाले, विहिरी, शेततळ्यांची स्वच्छता करून पावसाचे पाणी साठवण्यासाठी तयार राहावे.
स्थानिक शेतकऱ्यांची शासनाला बियाणे व खते उपलब्ध करून देण्याची मागणी.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शेतकऱ्यांनी शेताच्या मशागतीची काणे पूर्ण केली असून, त्यांना आता केवळ पावसाची प्रतिक्षा आहे. “सरकारने बियाणं आणि खते वेळेवर उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.” अशी शेतकऱ्यांनी शासनाला मागणी केली आहे.