जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. हॉटेल, ढाबे व रिसॉर्टवर होणाऱ्या पार्टी, त्यात मद्यप्राशनानंतर वाहन चालविणे तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांसह प्रवेश-निर्गमन मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविणार असून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार असून, शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र पथक कार्यरत राहणार आहे.
नववर्षाच्या उत्साहात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन होत असताना, निवडणूक कालावधी सुरू असल्याने पोलिस-प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली, छत्रपती संभाजीनगर महामार्गासह शहराच्या चारही बाजूंनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवू नये, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

