जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे बनावट रूप धारण करून पती-पत्नीने १८ तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील हितेश रमेश संघवी (४९) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (४५) हे सध्या नवी मुंबईत राहतात. नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत बेरोजगारीचा गैरफायदा घेत त्यांनी जळगावातील तरुणांना लक्ष्य केले. हितेश संघवीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील पीए असल्याचे भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रे, लेटरहेड आणि नियुक्तीपत्रांचा वापर केला.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी रेल्वेत नोकरी, म्हाडाच्या योजनेत फ्लॅट, रेल्वेचे टेंडर आणि रेल्वे अधिकाऱ्यांसाठी गाड्या भाड्याने देण्याच्या आमिषाने तरुणांकडून रक्कम उकळली. हर्षल शालिग्राम बारी यांच्याकडून १३ लाख ३८ हजार रुपये, तर इतर १७ जणांकडून ४२ लाख २२ हजार रुपये घेऊन एकूण ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही कोणतेही काम न झाल्याने पीडितांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

