जळगाव | प्रतिनिधी पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक आणि सामाजिक सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रोजगाराच्या बहाण्याने फसवून नेण्यात आले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाच्या धक्क्यातून आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
फसवणूक, विक्री आणि जबरदस्ती विवाह
मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी मुलीला नाशिक येथे रोजगाराच्या नावाखाली नेले. तेथून तिला कोल्हापूरमधील कुटुंबाला अडीच लाख रुपये आणि दागिन्यांच्या मोबदल्यात विकण्यात आले. विक्रीनंतर तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. यामुळे मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली होती. नंतर तिचा गर्भपात झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
पीडितेचा पलायन, पोलिसांचा आरोप
या सगळ्या घटनांमुळे व्यथित झालेली पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी घरी परत आली आणि तिने संपूर्ण आपबीती सांगितली. यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठ दिवस उलटूनही रामानंदनगर पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
वडिलांची आत्महत्या आणि पोलिसांविरोधातील संताप
पोलिसांची उदासीनता, समाजातून मिळणाऱ्या धमक्या आणि मुलीच्या भवितव्यासंदर्भातील चिंता यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितले की, जबपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही.
CBI चौकशीची मागणी
या प्रकारामागे मोठे मानव तस्करीचे रॅकेट असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची CBIमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकार व केंद्रीय गृहखात्याशी यासंदर्भात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.