Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमअल्पवयीन मुलीचा बालविवाह उघड : प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार समोर ; पतीसह १०...

अल्पवयीन मुलीचा बालविवाह उघड : प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार समोर ; पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा केलेला बालविवाह आणि त्यानंतर ती गर्भवती राहून तिने बाळाला दिलेला जन्म यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या १७ वर्षीय मुलीचे वय उघड झाल्यानंतर हा गंभीर प्रकार प्रकाशात आला. कायद्याला धाब्यावर बसवत अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पतीसह दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांसह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला असून, मुलीच्या पतीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

रुग्णालयात प्रसूतीदरम्यान उघडकीस आला बालविवाह.
जळगाव तालुक्यातील ही अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूतीनंतर तपासणी करताना, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांना मुलीचे वय संशयास्पद वाटले. चौकशी करताच मुलगी केवळ १७ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच डॉ. रोकडे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

कागदपत्रांच्या तपासणीत सिद्ध झाला अल्पवयीन दर्जा.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पाटील आणि देविदास चिंचोरे यांनी तातडीने तपास सुरू केला.पोलिसांनी रुग्णालयातील नोंदी आणि मुलगी शिकत असलेल्या शाळेतून जन्मदाखला मिळवला. दोन्ही कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पीडित मुलीचे वय फक्त १७ वर्ष असल्याची पुष्टी झाली.

१५ मार्च २०२४ रोजी गुपचूप बालविवाह.
तपासात असेही समोर आले की, १५ मार्च २०२४ रोजी मुलीच्या कुटुंबियांनी चोपडा तालुक्यातील एका तरुणाशी तिचा विवाह लावून दिला होता. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे असणे अनिवार्य असतानाही संबंधितांनी बालविवाह केल्याचे स्पष्ट झाले. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली आणि नुकताच तिने बाळाला जन्म दिला.

१० आरोपींवर गुन्हा ; पती अटकेत, इतर फरार.
या गंभीर गुन्ह्याची नोंद ८ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केली.गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुलीचा पती, सासू-सासरे, मुलीचे आई-वडील, मामा, तसेच लग्न लावून देणारे इतर नातेवाईक अशा एकूण १० जणांचा समावेश आहे.मुलीच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई.
अल्पवयीन मुलींवर अन्याय करणाऱ्या बालविवाहासारख्या गंभीर गुन्ह्याविरोधात पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. बाललैंगिक शोषण, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या