जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील पोलनपेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी एटीएममधील पैसे काढण्याऐवजी संपूर्ण मशीनच उखडून नेण्याचा प्रकार घडवून आणला. या घटनेत सुमारे ७ लाख रुपयांची रोकड तसेच मशीनसह एकूण सुमारे ९.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलनपेठेतील सत्यम प्लाझा येथे असलेल्या एका खासगी बँकेच्या एटीएम केंद्राला चोरट्यांनी लक्ष्य केले. मध्यरात्री सुमारे १.२५ वाजेच्या सुमारास एक संशयित व्यक्ती तोंड झाकून एटीएममध्ये प्रवेश करताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. त्याने मशीनला मजबूत दोरखंड बांधला. बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाच्या साहाय्याने जोरदार ओढ दिल्याने मशीन जागेवरून उपटले गेले.यानंतर बाहेर थांबलेल्या इतर साथीदारांनी आत येत अवघ्या काही मिनिटांत मशीन वाहनात टाकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. संपूर्ण घटना अत्यंत वेगाने घडल्याने परिसरातील कुणालाही संशय आला नाही.
दरम्यान, या चोरीसाठी वापरलेले मालवाहू वाहन जोशी पेठ भागातून चोरल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर कंडारीजवळील मन्यारखेडा शिवारात हे वाहन तसेच फोडलेल्या अवस्थेतील एटीएम मशीन आढळून आले. मात्र, मशीनमधील रोकड आधीच काढून नेण्यात आली होती.बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एटीएममध्ये १० लाख रुपये भरले होते. चोरीच्या वेळी अंदाजे ७ लाख रुपये शिल्लक होते. या घटनेत रोकड व मशीन मिळून सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

