Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमअवैध गांजा विक्री करणाऱ्यास अटक : १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा जप्त

अवैध गांजा विक्री करणाऱ्यास अटक : १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एमआयडीसी पोलिसांनी अवैधरीत्या गांजा बाळगणारा तसेच चोरटी विक्री करणारा आरोपीच्या मुसक्या आवळत एकूण १५ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा ९३,१५० रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. माहितीप्रमाणे, मच्छीबाजार, तांबापुरा परिसरातील एका घरात गांजा ठेवून विक्री केली जात असल्याचे समजताच, स.पो.नि. अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून संशयिताला पकडले. संशयिताचे नाव मेहमुद शेख मेहबुब (वय ५९, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) असे असून, त्याच्या घरातून १५ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा दोन गोणीत भरलेला गांजा जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाची किंमत तब्बल ९३,१५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पो.कॉ. गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब), (II) ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस २ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी रिमांड दिली आहे.

या कारवाईत सपोनि. अनिल वाघ, पोउपनि. राहुल तायडे, पोउपनि. चंद्रकांत धनके, पोहेका किरण चौधरी, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. गणेश ठाकरे, पोकॉ. किरण पाटील, पोकॉ. नितीन ठाकुर, पोकॉ. राहुल घेटे व पोकॉ. योगेश घुगे यांनी सहभाग घेतला. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोठेही अवैध अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या