Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव: भूसंपादन मोबदल्यात १६.९७ लाखांची फसवणूक ; महिला आरोपी अटकेत

जळगाव: भूसंपादन मोबदल्यात १६.९७ लाखांची फसवणूक ; महिला आरोपी अटकेत

नशिराबाद शिवारातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणासाठी सन २०११ व २०१३ मधील भूसंपादित जागेचे प्रकरण

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भूसंपादन विभाग जळगाव अंतर्गत भूसंपादित जागेची बनावट मालकी दाखवून शासनाकडील तब्बल १६ लाख ९७ हजार ३२६ रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने नाशिक येथील एका महिलेला अटक केली आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेली महिला आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील (वय ५९, रा. ज्ञानेश्वर नगर, देवळाली पाथर्डी रोड, नाशिक) हिने मौजे नशिराबाद, ता. जळगाव येथील गट नं. २२०६ मधील प्लॉट नं. ३ व ४ ही जागा स्वतःची असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सदर प्लॉट हे प्रत्यक्षात श्रीमती पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीचे असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणासाठी सन २०११ व २०१३ मध्ये एकूण ४८८ चौ.मी. क्षेत्र भूसंपादन करण्यात आले होते. या भूसंपादन मोबदल्यापोटी शासनाकडून दि. २१ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान १६,९७,३२६ रुपये आरटीजीएसद्वारे अदा करण्यात आले.आरोपीने स्वतःचे नाव पुष्पा देवराम जावळे असे दाखवून खोटी कागदपत्रे सादर करत बँक खाते उघडले व त्यात सदर रक्कम जमा करून घेतल्याचे निष्पन्न झाले. बँक कागदपत्रे, भूसंपादन कार्यालयातील दस्तऐवज, छायाचित्रे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून तिला अटक करण्यात आली.अटक झाल्यानंतर आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत असून, सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात महेश महाजन, ईश्वर लोखंडे, प्रशांत लाड, चंद्रकांत पाटील, छाया पाटील व वैशाली सादर यांचा समावेश आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या