आतापर्यंत या गुन्ह्यात संशयीत मास्टरमाईंड सह 10 जणांना अटक.
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्महाऊसवर चालविण्यात येणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करून पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांना यापूर्वीच अटक केली होती. या प्रकरणात आता मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत असून, कोल्हे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीदरम्यान 28 सप्टेंबर रोजी एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. कारवाईत 31 लॅपटॉप, अत्याधुनिक उपकरणे जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक हेच या रॅकेटचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला सरकारी अधिकारी किंवा अधिकृत संस्थांचे प्रतिनिधी म्हणून भासवत विविध आमिष दाखवून विदेशातील नागरिकांना शेकोटीत ओढत होते. दोन लॅपटॉपवर संशयास्पद व्यवहारांचे पुरावेही हाती लागले आहेत.दरम्यान, रॅकेटचा मुख्य सूत्रधार अकबर खान उर्फ अयान खान रौनक अली खान (40) व त्याचा साथीदार आदिल सय्यद निसार अहमद सय्यद (30) यांना स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने मुंबईतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. शनिवारी दोघांना जळगाव येथे आणून न्यायालयात हजर केले असता, 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर या गुन्ह्यातील अटक संशयितांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
कसा लागला सुगावा?
अकबर, आदिल आणि ऋषी या तिघांचा मुंबईत शोध घेत असतानाही पोलिसांना त्यांचा मागोवा लागत नव्हता. मात्र इम्रान नावाचा संशयित जेरबंद झाला आणि त्याच्याकडून मिळालेल्या धाग्यांवरून पुढील कारवाईला गती मिळाली. अनुभवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अखेर संशयित एका उपनगरातील फ्लॅटमध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि तिथे धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली.मुख्य सूत्रधार अटकेत आल्यानंतर आता या रॅकेटमागील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क, विदेशी नागरिकांकडून उकळलेली रक्कम कुठल्या खात्यांमध्ये जमा झाली आणि आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास अधिक सखोल करण्यात येणार आहे.

