जळगाव किंग्ससाठी सर्वाधिक चुरस; ओम मुंडे सर्वात महागडा खेळाडू
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग–२०२६ (JCL T-20 पर्व-२)’ स्पर्धेसाठी फ्रँचायझी व आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या ऑक्शनमध्ये जळगाव किंग्स संघासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली असून ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली.यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या लिलावात ओम मुंडे हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले. विविध संघांनी प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावत संघबांधणी मजबूत केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेसाठी जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंट्स, जामनेर ब्लास्टर्स व पाचोरा टायटन्स हे संघ निश्चित करण्यात आले.ऑक्शनमध्ये सहभागी संघमालकांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहण्याची संधी मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढण्याची प्रक्रिया अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे व हितेश पटेल यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सूरज जहांगिर यांनी केले, तर अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.
संघ व मालकांची माहिती :
जळगाव किंग्स – मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा, अतुल कोगटा | प्रशिक्षक : घनश्याम चौधरी | आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे
चाळीसगाव चार्जर्स – मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब | प्रशिक्षक : सचिन सोनवणे | आयकॉन खेळाडू : ओम मुंडे
रावेर रॉयल्स – मालक : सीए महावीर जैन | प्रशिक्षक : तनवीर अहमद | आयकॉन खेळाडू : नचिकेत ठाकूर
अमळनेर जायंट्स – मालक : सुहांस केमिकल्स, संदीप काबरा | प्रशिक्षक : राहुल निंभोरे | आयकॉन खेळाडू : शुभम शर्मा
पाचोरा टायटन्स – मालक : एस. के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी | प्रशिक्षक : पंकज महाजन | आयकॉन खेळाडू : सचिन चौधरी
जामनेर ब्लास्टर्स – मालक : रमेशदादा जैन | प्रशिक्षक : मुश्ताक अली | आयकॉन खेळाडू : शतायू कुलकर्णी.

