जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या हद्दवाढीची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. सध्या महापालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर शहरीकरण वाढत असून, मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हद्दवाढीची प्रक्रिया सध्यातरी थांबवण्यात आली असून, ती आगामी महापालिका निवडणुकीनंतरच सुरू केली जाईल.
महापालिकेची स्थापना २००३ साली झाली, तेव्हा जळगावचे क्षेत्रफळ सुमारे ६४ चौरस किलोमीटर होते. गेल्या दोन दशकांत शहराच्या सीमा मात्र कायम राहिल्या असल्या, तरी नागरी वसाहती, शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि उद्योगधंदे शहराच्या बाहेरपर्यंत पसरले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी, रस्ते, गटारे, वीज यांसारख्या सुविधा स्वतःच्या खर्चावर उभाराव्या लागत आहेत.
महापालिकेच्या हद्दीबाहेर झपाट्याने होणारे अनियंत्रित शहरीकरण, पर्यावरणीय आणि नागरी अडचणींना कारणीभूत ठरत आहे. यामुळे आसपासच्या ग्रामपंचायतींतील कुसुंबा, रायपूर, ममुराबाद, मोहाडी, बांभोरी आणि इतर काही गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे.
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले की, “हद्दवाढीची आवश्यकता आम्हाला पूर्णपणे मान्य आहे, मात्र ती एक सखोल प्रक्रिया असून ग्रामपंचायतींची नाहरकत आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया निवडणुकीनंतरच राबवली जाणार आहे.”
हद्दवाढीनंतर नव्या वसाहतींना नागरी सुविधा दिल्या जाऊ शकतील आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत नागरिकांना नियोजनाच्या अभावामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.