Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी : अट्टल चोरटे जेरबंद ;...

जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी : अट्टल चोरटे जेरबंद ; दोन गुन्ह्यांची उकल.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अट्टल चोरट्याला जेरबंद करत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे.

दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० ते दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान जळगाव शहरातील हमला वाडा, मारुती मंदिराजवळील शिवाजी नगर येथून ३० हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टीव्हा ४जी (क्र. एम.पी. ०४ एस.वाय. ७९५०) ही मोपेड चोरीला गेली होती. याप्रकरणी फिर्यादी उदयकुमार सुभाष कोचुरे (रा. शिवाजी नगर, जळगाव) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शोध पथकाच्या तपासातून संशयिताला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव इरफान खान उस्मान खान पठाण (वय २१, रा. मूळ साक्री, जि. धुळे, ह.मु. गेंदालाल मिल, जळगाव) असे सांगत, आपल्या साथीदार अदिल शेख उर्फ नाटया माजिद शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या मदतीने अॅक्टीव्हा चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदर गाडी जप्त करून आरोपीस अटक केली आहे.

दरम्यान, आरोपी इरफान पठाण याची सखोल चौकशी केली असता त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये साक्री पोलीस ठाणे हद्दीतून हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. एम.एच. १९ बीबी ७८४१) काळ्या-निळ्या रंगाची मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड केले. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. याप्रकारे जळगाव शहर व साक्री पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्ह्यांची उकल गुन्हे शोध पथकाने केली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व मा. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिश पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, दिपक शिरसाठ, पोना सुधीर साळवे, पोकॉ अमोल ठाकुर, भगवान मोरे, प्रणय पवार व पो.कॉ. राहुलकुमार पांचाळ यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या