जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून आपल्या राहत्या घरी वास्तव्य करीत असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी तेजस दिलीप सोनवणे यास मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांनी तसेच आरोपी सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे यास मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी प्रचलित कायद्यानुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.
मात्र दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी कोणतेही वैध कारण वा कायदेशीर परवानगी न घेता आपल्या घरी वास्तव्य करीत आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दपार आरोपी स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी.एन.सी. कॉलेज परिसरात गावठी पिस्तुलासह दहशत माजविताना आढळून आला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.