जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी देखील ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आषाढ सरींनी दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानुसार येत्या आठवड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळाली असून, आतापर्यंत सुमारे ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपर्यंत पेरणीचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत जाईल.राज्यात रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि हवामान बदलावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.