Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा कारागृहात थरार ; चार बंदींकडून एका बंदीवर जीवघेणा हल्ला!

जळगाव जिल्हा कारागृहात थरार ; चार बंदींकडून एका बंदीवर जीवघेणा हल्ला!

“तू त्याच्या नादी लागतो का?” म्हणत बेदम मारहाण — डोक्यावर टणक वस्तूने वार, बंदी गंभीर जखमी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) घडली. दुपारी सुमारास बॅरेक क्रमांक २ मध्ये दोन बंदी गटांमधील वैमनस्यातून एका बंदीवर चार बंदींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी गंभीर जखमी झाला असून, त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर जखमी बंदीचे नाव तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) असे आहे. तो एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. दुपारी सुमारास तेजस आपल्या बॅरेकमध्ये झोपलेला असताना, पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण या चार बंदींनी त्याला घेरले.

या चौघांनी सुरुवातीला तेजसला शिवीगाळ करत धमकावले. तेजसने कारण विचारले असता, आरोपींनी संतापून “तू भूषण माळी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस, तू त्याच्या नादी लागतो का?” असे ओरडत त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी शिवीगाळ करत त्याच्या डोक्याच्या मागील भागावर टणक वस्तूने वार केला. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता, हल्लेखोर बंदींनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेदरम्यान कारागृहातील शिपायांनी तत्काळ धाव घेऊन मध्यस्थी केली आणि भांडण थांबवले. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जखमी तेजस सोनवणे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रात्री साडेनऊ वाजता त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कारवाईची मागणी नागरिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या