जळगाव / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह :- केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे काम चांगले असल्याने यात दानशुर लोकांचा सहभाग वाढत आहे. आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जे पैसे शिल्लक असतील त्यातील काही भाग अशा समाजोपयोगी कामांसाठी दानशुरांनी द्यावा असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या बालभवनाच्या उद्घाटनाप्रंसगी ते बोलत होते.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक प्रकल्पांच्या मांदियाळीत सन २०१६ मध्ये रेल्वे स्टेशनवर पळून आलेल्या व भरकटलेल्या मुलांना आधार देणारा समतोल प्रकल्पाचा समावेश झाला. मुलांचे पुनर्वसनाचे काम करीत असताना स्वतंत्र बालभवन असावे असा प्रयत्न होताच. जागा घेण्यासाठी सहकार्य करणारे मंत्री ना. चंद्रकांत पाटील, बांधकामासाठी आर्थिक सहयोग देणारे अमेरिका स्थित डॉ. रविंद्र भिरूड व डॉ. निलिमा भिरूड यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले कै. हरिभाऊ तथा अन्नपूर्णाबाई भिरूढ बालभवनचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, डॉ. रविंद्र भिरूड यांचे बंधू डॉ. राजेंद्र भिरूड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
ना. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या जळगावातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1980 च्या दशकात मी प्रथमच जळगावला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी आलो. हे काम एका संन्याशाप्रमाणे होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करताना माझी राहण्याची व्यवस्था येथे या वास्तूत करण्यात आली होती. येथे राहून काम केले. या घराचे मालक वसंत पालकर त्यांचा मुलगा श्रींकात पालकर यांच्या आजी येथे राहत होत्या. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर मी राहत होतो. नंतर ही इमारत राजेश पांडे यानी विकत घेतली. राजेंश पांडे नंतर पुण्याला गेले. मग ही इमारत चांगल्या कामासाठी वापरात यावी म्हणून मी डॉ. भरत अमळकर यांच्याशी बोललो. समतोल प्रकल्पासाठी ही इमारत योग्य राहिल. रेल्वे स्टेशनवर हरविललेल्या मुलांच्या काही कालावधीच्या वास्तव्यासाठी ही जागा चांगली आहे. त्यानुसार डॉ. अमळकरांनी होकार दिला. त्यानुसार जागेचे व्यवहार करत ती केशवस्मृती च्या नावावर घेतली. पण बांधण्यासाठीचा प्रश्न होता. त्यावेळी अमेरीकेतील डॉ. भिरूड यांनी यासाठी आर्थिक मदत केली. आणि ही वास्तू उभी राहीली असल्याचे त्यांनी सांगीतले.
आजचा दिवस संस्मरणीय : डॉ. सुरेंद्र भिरूड….!
अमेरीकेत राहणारे डॉ. रवींद्र भिरूड यांचे लहान बंधू डॉ. सुरेंद्र भिरूड यांनी मनोगत व्यक्त केले. त्या ते म्हणाले की, आजचा दिवस संस्मरणीय आहे. माझे वडील सातवी तर आई चौथी शिकली होती. पळून आलेल्या मुलांसाठी हे बालभवन उभारले आहे. आम्ही न शिकता शेती करावी अशी आजोबांना वाटत होते. परंतू त्यासाठी वडील किन्ही गावाहून पळून भुसावळला आले होते. योगायोगाने अशाच मुलांसाठी आपण कार्य करत आहात. माझे वडील शेतात काम करणारे होते. कर्ज काढून त्यांनी आम्हा तिघा भावडांना डॉक्टर केले. माझे मोठे भाऊ डॉ. रवींद्र व वहिनी डॉ. निलीमा हे 45 वर्षापासून अमेरीकेत वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. आपल्या आईवडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी करावे अशी त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यांनी इंटरनेटवर संस्थाची चौकशी केली. परंतु आपण दिलेल्या पैशाचा योग्य वापर होईल हे कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी मला विचारणा केलली. माझ्या डोळ्यासमोर केशव स्मृती सेवा संस्था समुहाचे नाव होते. केशव स्मृती सेवा संस्थेचे अनेक सेवाभावी प्रकल्प मी स्वत: पाहीले आहे. त्यामुळे मी भाऊ व वहिनींना सांगीतले की तुम्ही जे काही देणार असाल त्याचा योग्य वापर व प्रामाणिकपणे उपयोग केला जाईल याची खात्री दिली. भरतदादा यांच्याशी माझी ओळख आहे. त्यांची कामाची पध्दत, सचोटी, मेहनत आणि प्रामाणिकपणा वाखाण्याजोगा आहे. म्हणूनच हा निधी त्यांना दिला. आणि त्यातून ही वास्तू उभी राहली आहे. याचा अभिमान असल्याचे सांगीतले.
यावेळी केशवस्मृती परिवारातील सदस्य, डॉ. भिरूड यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.