Tuesday, March 24, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगावात कोयत्यांच्या धाकावर घरात घुसून तोडफोड; ४–५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात कोयत्यांच्या धाकावर घरात घुसून तोडफोड; ४–५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगर परिसरात जुन्या वादातून काही जणांनी एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून कोयत्यांच्या धाकावर तोडफोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाबाई करतार पवार (वय ५०) या आपल्या कुटुंबासह कुसुंबा येथे वास्तव्यास आहेत. २१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांचा एक गट हातात धारदार शस्त्रे घेऊन त्यांच्या घराजवळ आला. संबंधितांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.घरात घुसल्यानंतर आरोपींनी आरडाओरड करत “योगेश कुठे आहे?” अशी विचारणा केली व त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच स्वतःला “जळगावचे डॉन” म्हणवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोणी अडवण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी त्यांनी दिली.

यानंतर आरोपींनी घरातील भांडी व इतर साहित्याची कोयत्यांच्या साहाय्याने तोडफोड करून नुकसान केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, २२ मार्च रोजी अरुणाबाई पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या