जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला तसेच दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून पाच पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.एमआयडीसी परिसरातील नीलंबरी हॉटेलच्या मागे व हॉटेल सुनील सिंगच्या समोर असलेल्या एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. या खात्रीशीर माहितीनंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अचानक छापा टाकून ही कारवाई केली.
छाप्यादरम्यान या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेली एक महिला व दोन पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी तेथे अडकवून ठेवण्यात आलेल्या पाच पीडित महिलांची सुटका करून त्यांना संरक्षण देण्यात आले.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात एपीआय योगिता नारखेडे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रवींद्र मोतीराया, नीलेश जगताप आदी सहभागी होते.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत.

