Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमलिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटणारे चोरटे MIDC पोलिसांच्या जाळ्यात ; चारचाकी वाहनासह मुद्देमाल...

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटणारे चोरटे MIDC पोलिसांच्या जाळ्यात ; चारचाकी वाहनासह मुद्देमाल हस्तगत

आरोपी नशिराबादचे….आरोपींना नशिराबाद येथे अटक…
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवकाची २२,५०० रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन चोरून पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना जळगाव MIDC पोलिसांनी अवघ्या काही तासांतच गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले तब्बल पाच लाखांचे मारुती अर्टिगा चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे MIDC गुन्हे शोध पथकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

ही घटना दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली होती. अजिंठा चौक बसस्टॉप येथे धुळे येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना फिर्यादीस एका चारचाकी वाहनातील अज्ञात इसमांनी लिफ्ट देण्याची ऑफर दिली. विश्वास संपादन करून वाहनात बसविले असता, पुढील सीटवर प्रवाशांची दाटी दाखवून फिर्यादीस खाली उतरविण्यात आले. त्यानंतर खिशातील २२,५०० रुपये रोख व मोबाईल फोन चोरीस गेले असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने तात्काळ MIDC पोलिसात तक्रार दिली होती.

फिर्यादीनुसार MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. नेत्रम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुंदनसिंग बयास यांच्या मदतीने सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून आरोपींचा शोध घेऊन नशिराबाद बाजार परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसिम अजमल खान (वय ३५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) जाफर उल्ला कहुल्ला कासार (वय ४२, रा. साथी बाजार, नशिराबाद, ता.जळगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत दोन्ही आरोपींनी इतर दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २२,५०० रुपये रोख, चोरीस गेलेला मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेले मारुती अर्टिगा वाहन हस्तगत केले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर कारवाईत पो. उ. नि. राहुल तायडे, पो. उ. नि. चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, पो. हे. का. गणेश शिरसाळे, प्रमोद लाडबंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोना. प्रदीप चौधरी व पो. का. नरेंद्र मोरे सहभागी होते.

सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या आरोपींवर यापूर्वीही विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या