Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव महापालिकेवर महायुतीचा ऐतिहासिक ताबा..! ७५ पैकी ६९ जागांवर निर्विवाद विजय ;...

जळगाव महापालिकेवर महायुतीचा ऐतिहासिक ताबा..! ७५ पैकी ६९ जागांवर निर्विवाद विजय ; भाजप-शिंदे गटाचे शहरात वर्चस्व

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत शहराच्या सत्तेवर आपला ठसा उमटवला आहे. एकूण ७५ जागांपैकी तब्बल ६९ जागांवर विजय मिळवत महायुतीने स्पष्ट बहुमतासह महापालिकेवर नियंत्रण प्रस्थापित केले. या निकालामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे शहरातील राजकीय बळ अधिक ठळक झाले आहे.निवडणूक निकालानुसार भाजपने ४६ जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) पाच जागांवर विजयी झाली असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.

उमेदवारी व निकालांचे गणित.
महायुतीच्या माध्यमातून भाजपने ४७, शिवसेना शिंदे गटाने २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी भाजपचे ४६, शिंदे गटाचे २२ आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला. टपाली मतमोजणीपासूनच भाजप व शिंदे गटाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत टिकून राहिली.

ठाकरे गटाचा काही प्रभागांत प्रभाव.
महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी ठाकरे गटाने काही प्रभागांत आपली ताकद दाखवून दिली. प्रभाग क्रमांक १७ मध्ये ठाकरे गटाच्या चारही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. यामध्ये अक्षय वंजारी, इब्राहिम पटेल, जरीनाबी शब्बीर शहा आणि हीनाबी शाकीर खान यांचा समावेश आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधून ठाकरे गटाच्या अर्शिन खाटीक यांनीही विजय मिळवला.

ईव्हीएम सीलवरून वाद, मतमोजणी थांबली.
मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक १ ते ३ मध्ये काही ईव्हीएम यंत्रांचे सील तुटल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून काही काळ मतमोजणी स्थगित केली. निवडणूक निरीक्षक व आयुक्तांनी स्वतः केंद्रावर उपस्थित राहून यंत्रे, कागदपत्रे आणि प्रक्रिया तपासल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली.

कारागृहातूनही विजय हा प्रमुख चर्चेचा विषय.

प्रभाग क्रमांक ११-ड मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी महापौर ललित विजय कोल्हे यांनी विजय मिळवला. ते सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर बोगस कॉल सेंटरप्रकरणी गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे त्यांची आई सिंधू कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे हेही निवडणुकीत विजयी झाले.

फेरमतमोजणीची मागणी, ठिय्या आंदोलन.
प्रभाग क्रमांक १० मध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांना ५६९२ मते मिळाली, तर भाजपचे जाकीर खान रसुल खान यांना ५८९२ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या निकालावर आक्षेप घेत कुलभूषण पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र त्यांना न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे त्यांनी मतमोजणी केंद्रावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा.
७५ पैकी ६९ जागांवर विजय मिळवल्याने महायुतीचा महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे. या निकालामुळे जळगावच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर महायुतीचा ठसा अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या