जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गात आरक्षण निश्चित झाल्यानंतर शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. आरक्षण जाहीर होताच आता या प्रतिष्ठेच्या पदावर कोण विराजमान होणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागांसह अग्रस्थानी असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व अपक्ष प्रतिनिधित्व देखील सभागृहात आहे. गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याचे स्पष्ट झाले.
ओबीसी महिला नगरसेविकांची संख्या निर्णायक.
महापालिकेच्या सभागृहात अनेक ओबीसी महिला नगरसेविका निवडून आल्या असून त्यामुळे महापौरपदासाठी स्पर्धा बहुरंगी बनली आहे. सामाजिक समतोल, संघटनात्मक निष्ठा, प्रशासनाचा अनुभव आणि पक्षांतर्गत गणित या सर्व निकषांवर संभाव्य नावांची चाचपणी सुरू आहे.
लेवा पाटीदार समाजाकडे लक्ष.
महापौरपद लेवा पाटीदार समाजातील महिलेकडे जाण्याची शक्यता राजकीय चर्चेत पुढे येत आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे या नावाची सर्वाधिक चर्चा असून त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. संघटनात्मक बांधिलकी, प्रदीर्घ अनुभव आणि पक्षातील विश्वासार्हता हे त्यांचे बलस्थान मानले जात आहे.याच समाजातील दीपमाला मनोज काळे यांचे नावही चर्चेत असून त्यांनी सभागृहात केलेल्या सक्रिय कामगिरीमुळे त्यांची दखल घेतली जात आहे. प्रशासनातील कामकाजाची जाण आणि समन्वय कौशल्य यामुळे त्या देखील प्रबळ दावेदार ठरू शकतात.
नगरसेविका गायत्री राणे अनुभवाधिष्ठित पर्यायही चर्चेत.
प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आलेल्या गायत्री इंद्रजीत राणे या अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार होऊ शकतो.माजी महापौर राहिलेल्या जयश्री सुनील महाजन या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यापूर्वी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे नाव पुढे येत असले तरी अलीकडील राजकीय बदल आणि पक्षांतर्गत समीकरणे त्यांच्यासाठी कितपत अनुकूल ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘धक्का तंत्र’ लागू होणार का?
भाजपने यापूर्वी गटनेतेपदाच्या निवडीत अनपेक्षित निर्णय घेतल्याचा अनुभव लक्षात घेता, महापौरपदासाठीही असा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रभाग १३ मधून बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली अमित पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. स्थानिक राजकीय समीकरणे आणि नेतृत्वाशी असलेले निकट संबंध यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो.याशिवाय प्रभाग ७ मधील अंकिता पंकज पाटील यांचे नावही ‘सरप्राइज पॅकेज’ म्हणून चर्चेत आहे. नॉन-लेवा पर्यायांचा विचार झाल्यास अशा नावांना संधी मिळू शकते.
इतर ओबीसी समाजातील महिलाही रेसमध्ये.
लेवा समाजाव्यतिरिक्त इतर ओबीसी समाजातील महिलांमध्येही महापौरपदासाठी पात्र उमेदवार आहेत. प्रभाग ४-ब मधील विद्या मुकुंद सोनवणे (कोळी समाज), प्रभाग ८-अ मधील कविता सागर पाटील, तसेच प्रभाग १०-ब मधील माधुरी अतुल बारी (बारी समाज) या सर्व ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांची नावेही चर्चेत आहेत.
अंतिम निर्णयाकडे लक्ष.
पक्षश्रेष्ठी कोणत्या निकषांवर अंतिम निर्णय घेतात—अनुभव, सामाजिक संतुलन की राजकीय रणनीती—हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.महापौरपदासाठीची ही निवड केवळ व्यक्तीची नसून आगामी काळातील महापालिकेच्या दिशादर्शक ठरणार असल्याने जळगाव शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे

