जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रजा कॉलनी येथे डेंग्यू संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव महापालिका दवाखाना विभाग व जिल्हा हिवताप नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान संशयित रुग्णांचे रक्त नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात आले. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, तसेच आरोग्य सेवक व्ही. एस. पवार, आरोग्य सहाय्यक के. बी. नागराळे व ए. पी. सपकाळे उपस्थित होते. त्यांच्यासोबत GNM, ANM व MPW कर्मचारी देखील कार्यरत होते.
आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, डेंग्यूची लक्षणे — ज्वर, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी किंवा त्वचेवर लाल चटके आढळल्यास त्वरित नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
आरोग्य यंत्रणेने परिसरातील स्वच्छतेवर भर देत नागरिकांना घराभोवती पाणी साचू न देण्याचे निर्देश दिले आहेत. डासांची पैदास रोखण्यासाठी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“स्वच्छता ठेवा, डेंग्यूवर मात करा!” हा संदेश देत ही मोहीम जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.