Monday, March 30, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात ‘कोंबींग ऑपरेशन’ ; ९६ जण ताब्यात, १८...

जळगाव महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात ‘कोंबींग ऑपरेशन’ ; ९६ जण ताब्यात, १८ जणांना अटक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव शहर पोलीस दलाने शुक्रवारी पहाटे अचानक कोंबींग ऑपरेशन राबवून दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९६ संशयित इसमांना ताब्यात घेतले. यामध्ये न्यायालयाने काढलेले नॉन बेलेबल वॉरंट असलेले १८ आरोपी अटक करण्यात आले असून उर्वरित ७८ इसमांना शांतता राखण्याची समज देऊन सोडून देण्यात आले.मा. पोलीस अधीक्षक (सो.) जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत हे कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

कोंबींग ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून ४१, रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतून १६, शनीपेठ पोलीस ठाणे हद्दीतून २१ तर जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतून १८ असे एकूण ९६ इसम ताब्यात घेण्यात आले. यापैकी १८ इसमांविरोधात न्यायालयाने समन्स व बेलेबल वॉरंट बजावूनही ते हजर राहत नसल्याने नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. या सर्व वॉरंटची अंमलबजावणी करत त्यांना अटक करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून अशाच प्रकारची कडक कारवाई पुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या