महापौरपदासाठी बेंडाळे, बरडे, खडके, घुगे, काळे, हाडा यांची तर उपमहापौरपदासाठी मनोज चौधरींसह कोल्हे, पोकळे, सोनवणे यांची नावे चर्चेत.
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून आता महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे महापौरपद, तर मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट)कडे उपमहापौरपद जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतून जुन्या निष्ठावंतांसह तरुण चेहऱ्यांची नावे चर्चेत आली असून अंतिम निवडीचा कस वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.महापालिका निवडणुकीत भाजपचे कमळ चिन्हावर निवडून आलेले सर्व ४६ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट)चे धनुष्यबाण चिन्हावर २३ पैकी २२ उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून प्रफुल्ल देवकर हे एकमेव उमेदवार विजयी ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधील अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे हे शिवसेना (शिंदे गट)ला पाठिंबा देण्याची शक्यता असून त्यामुळे महायुतीचे संख्याबळ ७५ पैकी ७० इतके होत आहे.
निवडणूक निकालानंतर आता महापालिकेतील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत महापौर व उपमहापौर पदाची निवड महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये ज्यांना आजपर्यंत या पदांची संधी मिळालेली नाही, अशा निष्ठावंत व कार्यक्षम नगरसेवकांना संधी देण्यावर भर राहणार असल्याची चर्चा आहे. तसेच महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र भाजपकडे महापौरपदासाठी संभाव्य नावे आधीच निश्चित झाल्याची माहिती आहे.भाजपकडून डॉ. विश्वनाथ खडके हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून उज्ज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यांच्यासह राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव महापौरपदासाठी भाजपच्या यादीत आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले नितीन लढा, सनील महाजन, जयश्री महाजन यांना संघटनात्मक पातळीवर अन्य जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट)कडून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी हे उपमहापौरपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीण रामदास कोल्हे, दिलीप बबनराव पोकळे, गणेश उर्फ विक्रम किसन सोनवणे तसेच सिंधुताई कोल्हे यांची नावेही उपमहापौरपदासाठी चर्चेत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे हे गटनेतेपदी कायम राहतील, अशी माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळत आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी होणारी ही निवड जळगाव महापालिकेच्या पुढील कारभाराची दिशा ठरवणारी ठरणार असून महायुतीतील अंतिम निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

