जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- काल दि. ३ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह २०२५ च्या तिसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देत विविध उपक्रम राबविण्यात आले. पाणंद रस्ते मोकळे करणे, मोजणी करून हद्दी निश्चित करणे तसेच सार्वजनिक वृक्षारोपण या उपक्रमांद्वारे ग्रामीण वाहतूक सुलभ करणे, सीमावाद टाळणे आणि पर्यावरण संवर्धन ही उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देण्यात आला.
शासन निर्णय दिनांक २९ जुलै २०२५ अन्वये १ ते ७ ऑगस्टदरम्यान सुरू असलेल्या महसूल सप्ताहांतर्गत आज नशिराबाद मंडळातील जळगाव खुर्द – खिर्डी शिवरस्त्याचे लोकसहभागातून मोकळेकरण करण्यात आले. यानंतर शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूस दुतर्फा वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.
या प्रसंगी मा. तहसीलदार सो. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी नशिराबाद, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, स्थानिक शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून सहभाग नोंदविल्यामुळे उपक्रम यशस्वी झाला.
महसूल विभाग, जळगाव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की महसूल सप्ताहाच्या पुढील दिवसांमध्येही ग्रामविकासासाठी प्रशासनासोबत सक्रिय सहभाग घ्यावा.