जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे सत्र थांबत नसताना स्थानिक गुन्हे शाखेने एका बनावटी मोटार सायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी बनावट तक्रार, गाडीवरील बनावट नंबर प्लेट आणि फायनान्स कंपनीची फसवणूक या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
२४ जून रोजी पोलिसांना अशोक हिरामण मोरे (रा. दगडी मनवेल, ता. यावल) याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई करत मोरे यास ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
तपासात उघड झाले की सदर मोटार सायकल काही वर्षांपूर्वी प्रमोद निलेश कोळी (रा. भुसावळ) याने फायनान्सवर घेतली होती. मात्र हप्ते थकवून गाडी चोरीला गेल्याचा बनाव करून भुसावळ पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये तक्रार नोंदवली होती. याच गाडीचा खरा नंबर MH19/DK0755 असून तिच्यावर बनावट नंबर MH19/CC6640 लावण्यात आला होता.
गाडीची खरेदी-विक्री जफर शेख उस्मान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) या एजंटच्या माध्यमातून झाली होती. अशोक मोरे याने ही गाडी १६,००० रुपयांना खरेदी केली होती आणि एजंटने त्यातून २,००० रुपये कमिशन घेतले होते.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (CCTNS क्र. २८५/२०१९, कलम ३७९ भादंवि) कारवाई केली आहे. गाडी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकों बबन पाटील आणि पोकों प्रदीप सपकाळे सहभागी होते.