जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक केंद्र असलेल्या जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि प्रदूषण या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. खासदार स्मिता वाघ यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यासह आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.सध्या जळगाव शहरातूनच अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक होत असल्याने अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड ताण येत असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहराबाहेरूनच वाहतुकीला पर्यायी मार्ग देणारा रिंग रोड अत्यावश्यक असल्याचे निवेदन खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सादर केले आहे.
जळगावचा प्रस्तावित रिंगरोड नकाशा.
प्रस्तावित रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाहेर वळवता येणार असून रस्ते सुरक्षेत वाढ होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच औद्योगिक, लॉजिस्टिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल. यासोबतच क्षेत्रीय संपर्क सुधारून भारतमाला योजनेच्या उद्दिष्टांनाही गती मिळणार आहे.हा रिंग रोड राष्ट्रीय महामार्ग एनएच-५३ (सूरत–नागपूर), एनएच-७५३ एफ (जळगाव–छत्रपती संभाजीनगर) आणि एनएच-७५ (जळगाव–चाळीसगाव–मनमाड) या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे शहरात प्रवेश न करता लहान-मोठ्या वाहनांना थेट पर्यायी मार्ग उपलब्ध होईल व अंतर्गत वाहतुकीवरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल.
या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंतची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिंग रोडला मंजुरी मिळाल्यास जळगाव शहराच्या भविष्यातील विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दरम्यान, प्रस्तावित रिंग रोड जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गाला छेदणार असल्याने समृद्धी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जळगाव शहराच्या कोणत्याही भागातून छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाकडे सहज प्रवास करता येणार असून शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. यासोबतच जळगाव विमानतळाकडे जाण्यासाठी कमी अंतराचे पर्यायी मार्ग खुले होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

