Wednesday, October 22, 2025
police dakshta logo
Homeजळगावपाडवा पहाट मैफलीत रसिकांचा मंत्रमुग्ध सहभाग

पाडवा पहाट मैफलीत रसिकांचा मंत्रमुग्ध सहभाग

डॉ.चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंगवाणीने रंगली सुरेल सकाळ

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीस रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महात्मा गांधी उद्यानात पहाटे सहा वाजता सुरू झालेल्या या सुरेल मैफलीत प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते डॉ. चारुदत्त आफळे यांनी नाट्यसंगीत व अभंगवाणीचा अप्रतिम संगम सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना ने झाली. ही वंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा सोहळा डॉ. रणजीत चव्हाण, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे आणि कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते पार पडला.कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे आणि शरदचंद्र छापेकर यांनी केला. कार्यक्रमाचे संयोजक सूत्रसंचालन अनघा नाईक-गोडबोले यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

यानंतर डॉ. आफळे यांनी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगातील नाट्यपदांचा एक मनमोहक प्रवास घडविला. १८८२ सालापासूनचा हा संगीत प्रवास “पंचतुंड नररुंड मालधर” या नांदीने सुरू झाला. पुढे संगीत मानापमान नाटकातील “चंद्रिका ही जणू”, संत कान्होपात्रातील “पतीत तू पावना”, रणदुंदुभी मधील “दिव्य स्वातंत्र्यरवी”, तसेच देव दिना घरी धावला मधील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी” ही नाट्यपदे सादर करत रसिकांना स्वरांच्या गारुडात गुंतविले.

त्यानंतर मत्स्यगंधा नाटकातील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” हे नाट्यपद सादर झाले आणि सभागृहातील प्रत्येक रसिक त्यात रंगून गेला. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या अविस्मरणीय संगीत नाटकातील “तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गननराज” आणि “सुरत पिया की छिन् बिसुराये” या पदांनी मैफलीचा शिखरबिंदू गाठला. शेवटी “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भावस्पर्शी भैरवीने या दोन तासांच्या संगीतयात्रेची सांगता झाली.रसिक वर्गाने तब्बल दोन तास हा अद्वितीय संगीतानुभव तल्लीन होऊन अनुभवला. “ही मैफल केव्हा संपली हे कळलंच नाही,” असे अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते.

या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनीही उपस्थित राहून रसग्रहण केले. तसेच शहरातील अनेक मान्यवर, संगीतप्रेमी व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भव्य मैफलीस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे, वरुण देशपांडे, अनघा नाईक-गोडबोले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

“पाडवा पहाट”च्या या २४व्या पर्वाने पुन्हा एकदा जळगावच्या सांस्कृतिक परंपरेत सुरेल नवचैतन्य फुलविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या