जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी सण-उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत जळगाव शहरात व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर ऑपरेशनदरम्यान शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार, हद्दपार आरोपी तसेच वॉरंटधारकांची तपासणी करण्यात आली. एकूण ३९४ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८४ आरोपी आढळून आले. त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत समज देऊन सोडण्यात आले आहे.
कॉम्बिंग ऑपरेशन अंतर्गत जळगाव शहरातील विविध भागात तपासणी करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत: रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा आदी परिसरात तपासणी.
शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत: कांचननगर, विठ्ठलपेट, डॉ. आंबेडकर नगर, गोपाळपूरा, कोळीपेठ, मेस्कोमातानगर, गुरुनानकनगर, शनिपेठ गवळीवाडा, ज्ञानदेवनगर, तळेले कॉलनी, शंकरअप्पा नगर इत्यादी भागात तपासणी.
जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत: शिवाजीनगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहुनगर या भागात कॉम्बिंग ऑपरेशन.
रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत: राजीव गांधी नगर, समतानगर, महाबळ, पिंप्राळा हुडको, आझादनगर, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर या भागात तपासणी करण्यात आली.
या ऑपरेशनदरम्यान जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील २ हद्दपार आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच एकावर शस्त्र कायदा कलम ४/२५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील एक हद्दपार आरोपीवर शस्त्र कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच एकूण ७ आरोपींना NBW वॉरंट अंतर्गत अटक करण्यात आली असून भुसावळ रेल्वे गुन्ह्यातील एक पाहिजे आरोपी जळगावमध्ये सापडल्याने त्याला भुसावळ रेल्वे पोलीसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली एकूण ७ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस अधिकारी आणि ३१४ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव आणि मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी यापुढेही अशा प्रकारची अचानक कॉम्बिंग ऑपरेशन शहर व जिल्ह्यात राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळ्या, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात अक्षेपार्ह पोस्ट करणारे, गैंगवार प्रवृत्ती दाखविणारे घटक यांच्यावर सायबर विभागाच्या देखरेखीखाली कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

