जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस दलाकडून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ किलोमीटरची सायकल रॅली
ही सायकल रॅली रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता पोलीस मुख्यालय, जळगाव येथून सुरू होणार आहे. एकूण २५ किलोमीटर अंतराची ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरणार असून, यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
नागरिकांनी द्यावा सहभाग
या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे. शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, युवक-युवती यांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन फिटनेसच्या या महत्त्वपूर्ण संदेशाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
एकतेचा व आरोग्याचा संदेश
ही सायकल रॅली केवळ फिटनेसचा संदेश देणारी ठरणार नसून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्यही करणार आहे. नागरिक व पोलिस यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यास या उपक्रमातून मदत होणार असून, शहरात आरोग्य व एकतेचा नवा संदेश पोहोचविण्यात पोलीस दलाचा हा सकारात्मक उपक्रम मोलाचा ठरणार आहे.